Friday, January 6, 2023

नव्या निर्धारा निमित्त!

डेराडून सोडता सोडता एक रेकरूटमेन्ट चालू होती, आणि त्या व्यक्तीच्या बायोडेटावर त्याच्या ब्लॉगची लिंक पहिली. सहज ब्लॉग उघडला आणि वाचला, आणि वाचता वाचता मला माझ्या ब्लॉगची आठवण झाली. 

मग सहज ओपन करून तोही वाचला आणि जाणवलं कि बरं लिहायचो आपण. 

साधारण २००७ पासून मी ब्लॉगिंग करत होतो. तेव्हा काही गुगलचं 'टाईप इन मराठी' हे ऍप नव्हतं, आणि मुळात म्हणजे माझं मराठी लेखन  आजच्या इतकं सुद्धा शुद्ध नव्हतं. मराठी अशुद्धलेखन ही इंग्लिश मीडियमची देणगी. निवेदनाच्या माझ्या स्क्रिप्ट्स बघून आमच्या लेंभे काकू म्हणायच्या - राजे तुमच्या स्क्रिप्ट्स चोरी झाल्या तरीही चोर स्वतः परत आणून देईल, कारण त्याला वाचताच येणार नाहीत! तात्पर्य - तश्या मराठीतही मी ब्लॉग्स लिहीत असे. शिवाय मराठी - इंग्रजी असला भेदभाव मी करत नसे. ज्या भाषेत सुचेल त्या भाषेत लिहीत सुटायचे, आणि पोस्ट करायचे. पण त्यातही टायपिंगच्या चुका, स्पेलिंगच्या चुका, चुकीचे व्याकरण हे सगळं होतंच. 

त्यातले बरेच ब्लॉग्स वाचताना अजूनही तो कन्टेन्ट बरा वाटतो. आपण १५ वर्षांपूर्वी लिहिलेला कन्टेन्ट १५ वर्षांनंतर देखील वाचायच्या लायकीचा आहे (निदान आपला आपल्याला तरी) हे जाणवलं आणि म्हंटलं जमेल तसं पुन्हा एकदा ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करूयात. खरं हॉटेल्स, नाटक आणि प्रवास ह्या तीनही क्षेत्रांमध्ये रोजचे येणारे अनुभव सुद्धा लिहून ठेवण्यासारखे असतात. बऱ्याच वेळा हे लिहून ठेवायला पाहिजे असं वाटतं देखील, पण मग राहून जातं. आता अनायसे एका काहीश्या वेगळ्या निर्धाराने पुढे जायचे ठरवले आहे तर हा प्रयत्न देखील पुन्हा एकदा करून पहावा असा विचार मनात आला आहे. बघू कसं जमतं ते. 


No comments: