Monday, October 13, 2014

दो प्रकाश आमटे देना



तीन प्रकाश आमटे, मे आय गेट थ्री प्रकाश आमटे, भैया दो प्रकाश आमटे देना !!!

आयनॉक्स - पणजी च्या बॉक्स ऑफिस वरच्या या तिकीटविक्रीचा मला फार आनंद होत होता. हा आनंद द्विगुणित झाला, जेव्हा मी खिडकी वर पोचलो आणि बुकिंगचा चार्ट पहिला. फक्त पहिल्या दोन रांगांमध्ये काही निवडक सिट्स  उपलब्ध होत्या . बाकी थेटऱ हाउसफुल. साधारणतः अशी परिस्थिती आली कि आपल्याला वाईट वाटेल, विशेषतः जर आपण अडव्हानस बुकिंग करत असू. पण मला मात्र फार आनंद होत होता, दोन कारणांसाठी - एक म्हणजे मराठी चित्रपटाला हाउसफुलचा बोर्ड लागत होता आणि दुसरं आणि महत्वाचे कारण म्हणजे बाबांचे कार्य जाणून घेण्यासाठी लोक येत होते. एनटरटेन्टमेंटच्या पलीकडे सिनेमा पोचत होता आणि लोक तो तसा मान्य करत होते.

डॉ. प्रकाश बाबा आमटे - रियल हिरो हे मराठी आत्मचित्र समृद्धी पोरे यांनी सादर करुन खरं  तर प्रेक्षकांवर एकाप्रकारे उपकारच केलेत. कारण ज्या कार्याचा करावा तितका गौरव कमी आहे, असं  मानव सेवेच कार्य बाबा गेले किती वर्ष आनंदवनातून करत आले आहेत, आणि ते कार्य डॉ. प्रकाश आणि विकास आमटे तितक्याच निस्वार्थ पणाने पुढे चालवत आहेत आणि वाढवत आहेत. आमटे कुटुंबाला ओळखणारे, त्यांच्या कार्याची जाण असणारे अनेक लोक जगभरात आहेत, पण त्याहीपेखा जास्त लोक अशे आहेत कि ज्यांना बाबा कोण होते हे सुद्धा माहित नाहि. या अत्मचीत्रात एक तसा प्रसंग दाखवला पण आहे, आणि प्रत्यक्षात माहित नाही, पण रूपकदृष्ट्या तो खरा आहे. बाबांच्या कार्याची माहिती लोकांना व्हावी म्हणून मी गेले किती वर्ष माझ्या कार्यक्रमातून बाबां बद्दल बोलत आलो आहे. मित्र मंडळीनंना कधी विचारलं की बाबा आमटे महित आहेत का ? तर ते विचार करतात, निखिल विचारतोय  म्हणजे लेखक असतील, किंव्हा  नाटकात बिटकात काम करणारे कोणी असतील हाच विचार मित्र करायचे. एकाने तर पूर्ण आत्मविश्वासाने म्हंटले होते, हो हो मोठे लेखक आहेत ते. मग बाबांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल मी बोलणार आणि मंडळी खुश होणार अस चालायचं. या आत्मचित्रा  मुळे बाबांचं कार्य आता अधिक लोकांपर्यंत  पोचेल हे निश्चित.

वास्तवीक डॉ. प्रकाश आमटे यांनी हे आत्मचित्र बनवण्यसाठी परवानगी दिली, ह्या साठी त्यांचे आभार. कारण पब्लीसीटी  आणि स्वतःचं  कौतुक हे जस बाबांना  मान्य नव्हतं तसंच निशितच त्यांनाहि  मान्य नाहि. पण हा विचार थोडासा बाजूला ठेवून हा घाट घातला हे विशेष. नानांच्या अभिनयाला माणुसकीची आणि  डॉक्टरां बरोबरच्या चाळीस वर्षांच्या सहवासाची साथ आहेत्यांच्या इतके, प्रकाश आमटे इतर कोणीच साकारू शकलं  नसतं हे निश्चित. अर्थातच डॉ. मोहन अगाशे, सोनाली कुलकर्णी आणि सगळ्यांनीच उत्तम अभिनय केलाय. बाबा,साधना ताई, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे ही पात्र  साकारून  अभिनेते म्हणून ही सगळीच  मंडळी धन्य पावली असतील.

नागपूरला असताना आम्ही आनंदवनात नेहमी जात असू. बाबांच्या आणि ताईंच्या समाधीला नमस्कार करून प्राणीसंग्रहालयात जायचं, मग गावातून एक चक्कर मारून परत नागपूरला, हा आमचा नेहमीचा क्रम असयचा. नित्याच्या लागणाऱ्या काही वस्तू, टॉवेल, चप्पल तिथूनच घ्यायचो. बाबांच्या कार्याबद्दल अभूतपूर्व आकर्षण आणि पु. लं चा आनंदवननाशी असलेला संबंध, या मुळे आनंदवनात जायला मला फार आवडायचं, तिथे पु लं च्या नावाचं एक उद्यान ही आहे.

मात्र फार पूर्वी पासून माझ्या मनात एक इच्छा आहे, आणि मला वाटतं अनेक भारतीय आणि खास करुन खूप  मराठी माणसांच्या मनात देखील ही इच्छा असवी आणि ती म्हणजे बाबांना भारतरत्न प्रदान व्हावा ही. पुढे जाउन डॉ. प्रकाश आमटे यांना भारतरत्न प्राप्त होईल, तशी शक्यता नाकारता येत नाहि. कधी तरी सरकारला हे कार्य भारतरत्न प्रदान करून गौरवण्या योग्य वाटेल, पण त्याही आधी बाबांच्या स्मृतींना हा गौरव प्रदान झाला पहिजे. अतिशय दुर्गम भागात राहून, कुष्टरोग्यांची सेवा बाबा आणि ताईंनी निस्वार्थीपणाने केली. त्याची पब्लिसिटी केली नाही, तर फक्त आणि फक्त मानवतेच्या भावनेतून त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांना माणसाचं आयुष्य जगण्याचा हक्क दिला, आणि तो हक्क देण्यापूर्वी माणसाचं आयुष्य जगण्याचा त्यांना अधिकार आहे, ही जाणीव त्यांना करून दिली, आणि हे सगळं स्वतःच्या ऐशोआरामात जगण्याच्या अधिकारावर पाणी सोडून त्यांनी केलं. कलाकारांना, खेळाडूंना भारतरत्न प्रदान झाले आहेत, ते उचितच आहे, पण कलेच्या सेवेपेक्षा देखील, मानवसेवा मोठी नाही का ? आणि तीही मोबदल्याची अपेक्षा ठेवता.

मी अनेक कार्यक्रमातून बाबांना भारतरत्न मिळावा हा विचार बोलून दाखवला आहे, आणि त्या विचारला रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली आहे . बाबा गेले  त्यानंतर देखील मी , ताई आहेत तोवर हा खिताब बाबांना  प्रदान व्हावा, आणि ताईंनी तो स्वीकारावा असा विचार सादर केला. बाबा आमटे या धगधगत्या अग्नीकुंडाला हा पुरस्कार प्रदान व्हावा आणि त्या अग्नीकुंडातील त्या समिधेने तो स्वीकारावा हा भारत्रात्नाचाही सन्मानच होता. आता बाबा आणि ताई दोघे ही देहरुपाने नाहीत, पण कार्य अखंडीतपणाने सुरूच आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे- रीयल हीरो , हे आत्मचित्र सादर करून समृद्धी पोरे यांनी बाबा आणि ताईंच्या कार्याला  एक सुंदर अशी श्रद्धांजली वाहिली आहे, आणि प्रेक्षकांना या श्रद्धांजलीत सामावून घेतलं आहे. या निम्मिताने अधिकाधिक लोकांपर्यंत हे कार्य पोचावं आणि लवकरच  बाबांचा सन्मान भारतरत्न प्रदान करून व्हावा अशी आशा आपण करुयात.

बाबांचं कार्य थोर आहे. डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास आमटे संपूर्ण परिवाराच्या साथीने हे कार्य अविरतपणे पुढे नेत आहेत. कधी नागपूरला गेलात तर आनंदवनात नक्की जा. सर्व सेवांमध्ये महान अश्या मानव सेवेचा अग्निकुंड तिथे धगधगतोय. त्याचे तेज हेमलकश्या पर्यंत पोहोचलय, आणि ऊब अख्या जगभरात पसरलीये.